इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडेंट हॉटेलमध्ये एक बैठक घेतली असून या बैठकीत २८८ जागा लढण्याची तयारी केली असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्षांतील नेत्यांसोबत चर्चा करत २८८ जागांचा आढावा घेतला.
लोकसभा निवडणूक ठाकरे यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत लढवली होती. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे यांनी विधानसभेची निवडणुकीबाबत आढावा घेतला. महाविकास आघाडीसोबत राहून विधानसभा निवडणूक लढवल्यास आपल्या पारंपारिक आणि ताकद असलेल्या जागांवरच निवडणूक लढवावी लागणार आहे, त्यामुळे मर्यादित जागा लढवाव्या लागतील, अशी चर्चा झाली होती.
मुंबई, कोकण आणि मराठवाडा ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षांना किती जागा सोडल्या जाऊ शकतात, याबाबत ट्रायटेंड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत विचारविनिमय झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत ९०/९०/९० चा फॉर्म्युला चर्चेत असून उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात याव्यात, असा महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचा विचार आहे.