इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा प्रकार वरिष्ठांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या जागी दुसरे उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर या सातही मतदारसंघांत काँग्रेसच्या इच्छुकांनी लाँबिंग करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटात गेलेले बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी (वांद्रे पूर्व), अजितदादांचे स्वीय सहायक संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके (अमरावती), अशोक चव्हाण समर्थक जितेश अंतापूरकर (देगलूर), मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण), आमदार शिरीष चौधरी (रावेर), हिरामण खोसकर (इगतपुरी) या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा पक्षाला संशय आहे. त्यांची नावे जाहीरपणे सांगितली जात नसली, तरी या नावांची चर्चा असून त्यापैकी काहींनी पक्षावर टीका केली आहे. पटोले यांनाच धारेवर धरले आहे.
वांद्रे पूर्वमधून भाई जगताप, सचिन सावंत, अमरावतीतून डॉ. सुनील देशमुख, विलास इंगोले आणि अलीम पटेल, देगलूरमधून निवृत्ती कांबळे, माजी अपर आयुक्त व्यंकटराव वरवंटकर, माजी नगरसेवक धोंडिबा कांबळे मिस्त्री, उद्योगपती दीपक रामपूरकर , निवृत्त अपर जिल्हाधिकारी एम. बी. कांबळे. दीपक रामपूरकर, निवृत्त अधिकारी गिरकर, नांदेड दक्षिणमधून माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी सभापती अब्दुल समद यांची नावे इच्छुक म्हणून घेतली जात आहेत. रावेरमधून अद्याप एकाही इच्छुकांचा अर्ज नाही.