इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वर्धा : आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बस सोडल्या जात असून वर्ध्यामधून ४५ वारकऱ्यांना घेऊन बस पंढरपूरसाठी रवाना झाली होती. या बसला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे अपघात झाला. हा बस चालक मद्यप्राशन करून बस चालवत असल्याची मिळाल्याने विभागीय नियंत्रक संदीप रायमुलकर यांनी मद्यप्राशन करून वाहन चालवत असलेल्या चालकावर व वाहकावर निलंबनाची कारवाई केली.
वर्धा येथून निघालेली बस चालक सचिन गंगाधर गव्हाणे व वाहक प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता वर्धा जिल्ह्यातील ४५ वारकरी घेऊन पंढरपूरच्या दिशेने गव्हाणे व वाहक सूर्यवंशी हे बस घेऊन रवाना झाले. बस रात्री पुसद येथील माहूर फाट्याजवळ पोहचताच नशेत असलेल्या चालकाने रस्ता दुभाजकाला बस धडकवली. या घटनेत बसमधील ४५ प्रवासी थोडक्यात बचावले, तर बसमधील एक वयोवृद्ध महिला व मुलगा जखमी झाला आहे.
दरम्यान, या वेळी चालक व वाहक हे दारूच्या नशेत असल्याचे नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या लक्षात आले. चालकाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात बॅगमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. या वेळी पुसद पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. वर्धा आगाराला मिळताच आगार व्यवस्थापकांनी चालक आणि वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या अपघातामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना रात्री त्रास सहन करावा लागला.