नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 साठी, तयारीचा अंतिम टप्पा अधोरेखित करणारा हलवा समारंभ आज नवी दिल्ली येथे वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडला.
अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये सहभाग असलेल्या अधिकाऱ्यांची ‘लॉक-इन’ प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दर वर्षी हलवा समारंभ आयोजित केला जातो. 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर होणार आहे.वार्षिक आर्थिक विवरण (अर्थसंकल्प), वित्त विधेयक यासह केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व दस्तऐवज “केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲप” वर देखील उपलब्ध असेल, जेणे करून या सर्वात सुलभ डिजिटल माध्यमाचा वापर करणाऱ्या संसद सदस्य (खासदार) आणि सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पीय दस्त ऐवज सहज पाहता येतील. हे ॲप दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे, तसेच ते Android आणि iOS दोन्ही व्यासपीठांवर उपलब्ध असेल. हे ॲप केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पुढील वेब पोर्टलवरून देखील डाऊनलोड करता येईल: (www.indiabudget.gov.in)
23 जुलै 2024 रोजी संसदेत केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पीय दस्तऐवज मोबाईल ॲपवर उपलब्ध होतील.
हलवा समारंभाला केंद्रीय अर्थमंत्र्यांसह अर्थ मंत्रालयाचे सचिव आणि अर्थसंकल्प तयार करण्यात सहभाग असलेले केंद्र सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. समारंभाचा भाग म्हणून, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट प्रेसला (अर्थसंकल्पाचा छापखाना) भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.