येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शांत राहिले पाहिजे, त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. मी आजही राजीनामा द्यायला तयार आहे. कोणताही राजीनामा मागितला तरी मी द्यायला तयार आहे. राज्यात डोके फुटता कामा नये, यासाठी सर्वजण पुढे येत आहेत असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलतांना येवला येथे सांगितले.
ते म्हणाले की, गरीब दोन्ही समाजात आहेत. त्यात काही लोक संभ्रम निर्माण करू लागले. लग्नात जायचे नाही, हॉटेलात जायचे नाही.
हे कधी थांबणार यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली. हे थांबले पाहिजे यसाठी मी पुढाकार घेतला. पवार साहेबांनी हे पाहिले आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे. पवार साहेबांना अनुभव जास्त आहे. राज्यात शांतता निर्माण होण्यासाठी पवार साहेबांची त्यांची मदत घेतली तर काय हरकत आहे.. राज्यात कटुता वाढत आहे ती शांत राहिली पाहिजे. पटविण्याला अक्कल लागते पेटवायला नाही. जुळवायला अक्कल लागते जाळायला नाही.. सर्वांनी एकत्र येवून शांतता राखली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.