मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सनदी अधिकारी पूजा खेडकरचे प्रशिक्षण आठवडाभर थांबले आहे. पूजा १५ ते १९ जुलै या कालावधीत अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्पात इंटर्न म्हणून रुजू होणार होती; परंतु वाशिमच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला स्थगिती दिली आहे. दरम्यान, पूजाची पोलिसांनी चौकशी केली. डॉ. पूजाने आयएएस होण्यासाठी मिळवलेल्या ‘नॉन क्रिमीलेअर’ दाखल्याची अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत. दरम्यान, प्राप्तिकर विभागाकडून खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची माहिती आणि तिच्या आईवडीलांनी भरलेल्या कराची माहिती मागविण्यात आली आहे. पूजाच्या नावावर असलेल्या मालमत्तांची आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मागविण्यात आली असून. नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ही माहिती जमा करायला सुरुवात केली आहे.
वादग्रस्त पूजाच्या प्रकरणांची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सध्या चौकशी सुरू असून अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत आहेत. या चौकशी समितीला स्थानिक अहमदनगरचे जिल्हाधिकारी चौकशी करून सर्व माहिती देणार आहेत. पूजाचे आईवडील जरी एकमेकांपासून विभक्त झाल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यात आले असले, तरी दोघांचे उत्पन्न तपासले जात आहे. त्याचबरोबर पूजाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असून त्या मालमत्तेपासून तिला उत्पन्न मिळते. हे तपशील पूजाने प्राप्तिकर विभागाकडे दाखल केलेल्या प्राप्तिकर परताव्यातून समोर आले आहेत. पूजाने मिळवलेले ‘नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट’ खरे होते का? प्राप्तिकर परतावा भरताना दाखवलेल्या उत्पन्नांचे काय करायचे, हा प्रश्न आहे.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजाची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत ही चौकशी झाली. पूजा मुक्कामी असलेल्या वाशिमच्या विश्रामगृहावर रात्री सव्वा दहा वाजता पोलिसांचे पथक पोहचले होते. पूजाची बंद दाराआड तीन तास चौकशी पोलिसांनी केली. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पूजाने पोलिसांना काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली होती. वाशिमच्या एक महिला उपविभागीय अधिकारी नीलिमा आरज यांच्यासह दोन महिला पोलिसांनी वाशिमच्या विश्रामगृहावर तिची चौकशी केली. पूजाने पोलिसांना काय माहिती दिली आणि कोणती गुप्त माहिती होती हे समजू शकले नाही.
भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होण्यासाठी पूजावर अपंगत्व आणि ओबीसी आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप असून तिच्या अपंग आणि ओबीसी प्रमाणपत्राची पोलिस चौकशी होणार आहे. तिला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी करण्यात येणार आहे. औंध रुग्णालयाने तिचा अर्ज फेटाळला असताना नगर आणि पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून दिव्यांगाची प्रमाणपत्र मिळाल्याचे स्पष्ट झाले. पूजाच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली असून पूजाच्या उमेदवारीचे दावे आणि इतर तपशीलांची पडताळणी करणार आहे, ही समिती दोन आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. २०२३ मध्ये रुजू होण्यापूर्वी सरकारला दिलेल्या तिच्या स्थावर मालमत्तेच्या तपशीलात, पूजाने २०१५ मध्ये म्हाळुंगे, पुणे येथे दोन भूखंड खरेदी केले. यामध्ये एक प्लॉट ४२ लाख २५ हजार रुपयांना तर दुसरा प्लॉट ४३ लाख ५० हजार रुपयांना खरेदी केला. सध्या दोन्ही भूखंडांचे बाजारमूल्य ६ ते ८ कोटींच्या दरम्यान आहे.पूजाने २०१८ मध्ये पुण्यातील धानोरी परिसरात ४.७४ हेक्टर जमीन २० लाख ७९ हजार रुपयांना खरेदी केली. तिची सध्याची किंमत ३ ते ४ कोटी रुपये आहे. पूजाने २०२० मध्ये कोंढवा येथे ७२४ स्क्वेअर फुटांचा फ्लॅट ४४ लाख ९० हजार रुपयांना खरेदी केला, त्याची किंमत सध्या ७५ लाख रुपये आहे.
खेडकर कुटुंबाचा बाणेर मार्गावर बंगला असून या बंगल्यासमोर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामासाठीचे साहित्य त्यांच्या घरासमोरील फुटपाथवर ठेवण्यात आल्याने पूजाची आई मनोरमाने मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलवले, तर मनोरमाने पोलिसांशीही वाद घातला. पूजाच्या दिव्यांग प्रमाणपत्राचीही चौकशी होणार असून दिव्यांग आयुक्तांनी पुणे पोलिसांना पत्र पाठवले असून पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. पूजाला अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. ते प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय समितीतील सदस्यांचे म्हणणे मागविले आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. पूजाने दिव्यांग प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले. म्हणजे अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालय तसेच पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालय अशा दोन ठिकाणहून त्यांनी दिव्यांगाची प्रमाणपत्रे मिळवली होती.