नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी एकादशीचे औचित्य साधत गीतकार संगीतकार संजय गीते यांच्या एका अत्यंत आगळ्यावेगळ्या प्रकारच्या विठ्ठल भजनाचे प्रकाशन आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, माजी कृषी अधिकारी सुभाष महाजन, गीतकार संगीतकार संजय गीते, श्रावणी गीते, सामाजिक कार्यकर्ते गिरीश बच्छाव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठी संतांच्या साध्या सोप्या भाषेतील रसाळ शब्दांचे कौतुक करत कुठल्याही जातीभेदाला थारा न देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे विशेष कौतुक केले. अशा वारीचं यथार्थ चित्रण करणाऱ्या कवी सुभाष महाजन आणि संगीतकार संजय गीते श्रावणी गीते यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. महाराष्ट्रातून आणि भारतातूनच नव्हे तर जगभरातून सर्व धर्मीय लोक येऊन पंढरपूरच्या वारीची किमया अनुभवण्याचा प्रयत्न करत असतात. ह्या विठ्ठल भजनाची किमया देखील सबंध जगभर पोहोचेल आणि जिथे जिथे विठ्ठलाचे नाम घेतलं जाईल तिथे तिथे हे गाणं प्रसिद्ध होईल लोकांच्या ओठावरती हे गाणं रेंगाळत राहील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या.
युट्युबवर अत्यंत लोकप्रिय होत असलेल्या “संजय गीते म्युझिक” या वाहिनीवर हे गीत आज पासून लोकांना अनुभवता येईल.
निवृत्त महाबीज कृषी क्षेत्र अधिकारी श्री सुभाष महाजन यांनी लिहिलेले हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार संजय गीते यांनी संगीतबद्ध केले असून श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी त्याचे गायन केले आहे.
पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला असे ध्रुवपद असलेल्या या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे यातील विशेष वाद्य रचना आणि शब्द स्वरांची मांडणी अशा तऱ्हेने करण्यात आली आहे की ऐकणाऱ्याला आपण जणू वारीत दिंडी मध्ये चालत आहोत असा अनुभव येतो.