नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबाद शिवारात चैनस्नॅचरांनी धुमाकूळ घातला असून सोमवारी (दि.१५) अवघ्या पंधरा मिनीटात वेगवेगळया भागातून पायी जाणा-या दोन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले. या घटनेत सुमारे ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोड भागातील हर्षला हेमराज नेमाडे (रा.पिंगळे कॉलनी,राहू हॉटेलजवळ पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नेमाडे दांम्पत्य सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास परिसरातील मंदिरातून देवदर्शन करून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. गजानन पेट्रोल पंपा मागून नेमाडे दांम्पत्य राहू हॉटेलच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना डबलसिट दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळय़ा्तील सुमारे २५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली.
दुसरी घटना अवघ्या पंधरा मिनीटाच्या अंतराने परिसरातील रामकृष्ण नगर भागात घडली. सुवर्णा प्रमोद कु-हे (रा.राकृष्णनगर) या देवदर्शनासाठी परिसरातील मंदिरात जात असतांना श्रेया रेसिडन्सी समोर दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.