इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्लामाबादः पाकिस्तान सरकारने इम्रान यांच्या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देतांना मंत्री अत्ता तरार म्हणाले, की ते ‘पीटीआय’वर बंदी घालणार आहेत. पाकिस्तान आणि ‘पीटीआय’ एकत्र राहू शकत नाहीत. माजी पंतप्रधानांच्या पक्षावर बंदी घालण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करणार आहेत.
याबाबत पुढे माहिती देतांना तरार म्हणाले की, परदेशी निधी प्रकरण, नऊ मेची दंगल आणि सिफर प्रकरण तसेच अमेरिकेत मंजूर झालेला ठराव पाहता, ‘पीटीआय’वर बंदी घालण्यासाठी खूप विश्वासार्ह पुरावे आहेत. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे, की ‘पीटीआय’वर बंदी घालण्याबरोबरच ते माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी, माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी उपसभापती कासिम सुरी यांच्या विरोधात कलम ६ लागू करणार आहेत. विशेष बाब म्हणजे या कलम ६ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षित जागांच्या प्रकरणी ‘पीटीआय’ला दिलासा दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी इद्दत प्रकरणात पक्षप्रमुखांना दिलासा देण्यात आला. ‘पीटीआय’ महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव जागांसाठी पात्र असेल. गेल्या आठवड्यात दिलेल्या निर्णयाविरोधात सरकार पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयासमोर पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याचे माहिती मंत्र्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, ‘पीटीआय’ ‘नॅशनल असेंब्ली’मध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार आहे, तर सत्ताधारी आघाडीचे दोन तृतीयांश बहुमत कमी होणार आहे.