इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : झारखंडमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. येथील प्रादेशिक पक्ष असलेल्या भारतीय जनतंत्र मोर्चा बरोबर ते आघाडी करण्याच्या तयारी आहे. या पक्षाचे प्रमुख आणि भाजपचे माजी नेते सरयू राय यांची नुकतीच भेट झाली. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नितीश कुमार भाजपला झटका देतील काय, अशी चर्चा रंगली आहे. सरयू राय हे पूर्वी भाजपत होते. सध्या ते झारखंडमधील भारतीय जनतंत्र मोर्चाचे प्रमुख आहेत.
राय यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोठचिठ्ठी दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास यांचा त्यांनी पराभव केला. ते मोठे नेते म्हणून राजकारणात पुढे आले. संयुक्त जनता दलासोबत त्यांच्या पक्षाची आघाडी झाल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये संभाव्य भूमिका आणि आघाडीसंदर्भात चर्चा झाली असून निवडणुका एकत्रितपणे लढण्यावर सहमती झाली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संयुक्तच जनता दलाकडून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नितीश कुमार यांचे निकटवर्तीय आणि मंत्री विजय कुमार चौधरी यांनी राय आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट झाल्याचे तसेच विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे मान्य केले. झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत विविध बाजूंनी चर्चा झाली. दोन नेते एकत्र येतात, तेव्हा राजकीय चर्चा आणि संवाद होत असतो. राय हे संयुक्त जनता दलाचे चांगले मित्र आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.