मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले.
एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल व उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री.आठवले बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक दिगंबर दळवी यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, कौशल्य विकास विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.आठवले म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांमध्ये कौशल्य वृद्धीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचधर्तीवर कौशल्य विकास मंत्री यांनीही राज्याच्या कौशल्य विकासाला गती दिली आहे. उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातील कार्यकुशल मनुष्यबळ तयार केले जावे यासाठी राज्य शासन चांगला प्रयत्न करत आहे.
अधिकाधिक रोजगार निर्माण करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभाग, उद्योजक यांच्या समन्वयातून सर्वाधिक रोजगार निर्माण केले जातील. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे आणि विभागाला यशाकडे नेण्यासाठी सर्वांनी या कामात उत्स्फुर्त सहभाग घ्यावा.
कौशल्य विकास विभागाचे सचिव श्री. पाटील, आयुक्त श्रीमती चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पालकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभाग आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत सामंजस्य करार झाला. जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल यशस्वी उमेदवारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनांचे (MAPS) पोर्टलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्पर्धेतील विजेत्या संस्थांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी चांदूरबाजार, जिल्हा – अमरावती या संस्थेला प्रथम क्रमांक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड, जिल्हा- नांदेड संस्थेला व्दितीय क्रमांक तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध. पुणे (मुलींची), जिल्हा-पुणे या संस्थेचा तृतीय क्रमांक आला.
विभागीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुंबई विभागात फादर अॅग्नेल खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशी, जिल्हा- ठाणे, पुणे विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरुर, जिल्हा-पुणे,नाशिक विभागात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळवण, जिल्हा नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड जिल्हा जालना विभाग,अमरावती विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती,नागपूर विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा, जिल्हा वर्धा यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.