मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः पाठपुरावा करत होते.
त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगवरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा याजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.