नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या ‘डबल गेम’ नाटकाने सांधिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली. ‘नथिंग़ टु से’ या नागपूर प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या नाटकृतीस द्वितीय पारितोषिक मिळाले. महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादिकर यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘ती फ़ुलराणी’, छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागाने ‘उत्तरदायित्व’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘डबल गेम’, आणि नागपूर प्रादेशिक विभागाने ‘नथिंग टु से’ असे एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती सादर केल्या.
यावेळी बोलतांना अरविंद भादिकर म्हणाले की, या नाट्य स्पर्धेत मिळलेली ऊर्जा आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन कार्यालयीन कामात वापरून व्यवस्थापनाची अपेक्षा पुर्ण करण्याचे आवाहन केले. नाट्यस्पर्धेच्या निमित्त कलेच्या संवर्धनासोबत वीज कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून आपसातील संवाद, सहभाग व सांधिक भावना वाढीस लागते. या स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांनी दर्जेदार कला सादर केली. रसिकांना मनमुराद आनंद दिला. यातून तुम्ही सर्वजण विजयी ठरले आहात. स्पर्धेत सादर झालेल्या दर्जेदार नाट्य कृतींसाठी बॅकस्टेज आर्टीस्टसह सर्व कलावंताचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या नाट्यस्पर्धेचे यजमान तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हनाले की, माणसाच्या अंगात जन्मत: 64 कला असतात त्यात आता 65 व्या कलेची जोड मिळाली आहे आणि ती आहे कला आणि कलाकारांना दाद देण्याची, ही कला प्रत्येकाने आत्मसात करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी मुख्य अभियंते सुहास रंगारी,परेश भागवत, पुष्पा चव्हाण, ज्ञानेश कुलकर्णी, स्वप्निल काटकर, पवनकुमार कछोट, हरिष गजबे आणि कल्पना पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, स्पर्धेचे परिक्षक प्रभाकर आंबोने, विनोद तुंबडे आणि मंजुश्री भगत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांनी केले.
पारितोषिकांची सविस्तर यादी
सर्वोत्कृष्ट निर्मिती : (प्रथम) – डबल गेम, (व्दितीय) – नथिंग टु से
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : (प्रथम) – राजीव पुणेकर (डबल गेम), (व्दितीय) – संजय पुरकर (नथिंग टू से)
अभिनय – पुरूष : (प्रथम) – दुर्गेश जगताप (डबल गेम), (व्दितीय) – प्रसाद दिवाण (ती फुलराणी)
अभिनय – स्त्री : (प्रथम) – श्रद्धा मुळ्ये (डबल गेम), (व्दितीय) – श्वेता सांगलीकर (ती फुलराणी)
नेपथ्य : (प्रथम) – संजय कांबळे (ती फ़ुलराणी), (व्दितीय) – राजेंद्र जाधव (डबल गेम)
प्रकाश योजना : (प्रथम) – किशोर दाभेकर (नथिंग टु से), (व्दितीय) – सुनिल शिंदे (उत्तरदायित्व)
संगित : (प्रथम) – अनिल राजपूत (उत्तरदायित्व), (व्दितीय) – दिपक भोसले (ती फ़ुलराणी)
रंगभूषा व वेशभूषा : (प्रथम) – सतिश बनकर (ती फुलराणी), (द्वितीय) – राजश्री मोरे (डबल गेम)
बालकलाकार : राजश्री शिंदे (उत्तरदायित्व)
उत्तेजनार्थ : मंगेश कांबळे (ती फ़ुलराणी), पल्लवी गायकवाड (उत्तरदायित्व), अनुराधा गोखले (डबल गेम) आणि गौरी पुरकर (नथिंग टु से)