नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी रविवारी (दि.१४) गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यात तिघांसह दोघा पुरूषांचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना जुने सिडको भागात घडली. ईश्वर प्रभाकर मोरे (३४ रा.औदुंबर स्टॉप जवळ,गजानन क्लास मागे,जुना सिडको) यांनी रविवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात भिंतीला बांधलेल्या झोळीच्या दोरीने गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ संतोष मोरे यांनी त्यास बेशुध्द अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुसरा प्रकार ध्रुवनगर भागात घडला. पल्लवी निलेश जाधव (२९ रा.स्वामी दर्शन अपा.तुकाराम क्रिडांगण,ध्रुवनगर गंगापूर) या महिलेने रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडीबांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
तिस-या घटनेत विनोद शंकरराव देशमुख (५५ रा.साई विहार बंगलो,नरगीस दत्त शाळेजवळ,टकलेनगर) यांनी रविवारी आपल्या राहत्या घरात पंख्यात दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अमित पवार यांनी खबर दिली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.