मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ख्यातीप्राप्त “कॅम्लीन” उद्योग समूहाचे प्रमुख, महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक व “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज”चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे सोमवारी दुखद निधन झाले असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. कॅमलिन उद्योग समूहाचा पसारा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती असे सांगून ललित गांधी यांनी पुढे सांगितले की १९९० ते ९२ या काळात त्यांनी राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज”चे अध्यक्ष पद भूषवले. भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली त्या काळात निर्माण झालेल्या नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स”च्या वतीने राज्यभर व्यापारी- उद्योजकांच्या मध्ये प्रबोधनाचे काम केले या काळात त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती.
राज्यातील उद्योजकांचे स्थानिक स्तरावरचे प्रश्न तेथेच निकाली निघावेत यासाठी उद्योग मित्र समिती जिल्हा स्तरापर्यंत स्थापन्याची संकल्पना “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री”च्या वतीने श्री सुभाष दांडेकर यांनी तत्कालीन उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे मांडली. उद्योग मंत्र्यांनी त्यास मान्यता दिली व राज्यभर या समितीच्या सभा नियमित सुरू झाल्या. त्याचा फार मोठा फायदा राज्यातील उद्योग जगताला आजही होत असल्याचे ललित गांधी यांनी आवर्जून नमूद केले.
नाशिक येथे महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे स्व- मालकीचे कार्यालय सुद्धा त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सुरू करण्यात आले.
हजारो उद्योजकांना प्रेरणा देणारे हजारो लोकांना रोजगार देणारे ज्येष्ठ उद्योजक आपल्यातून निघून गेले आहेत ही बाब मनाला वेदना देणारी आहे. दांडेकर कुटुंबीयांच्या दुःखामध्ये राज्यातील संपूर्ण व्यापार उद्योग क्षेत्र सहभागी आहे. अशा शब्दात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांनी सुभाष दांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.