नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – हॉटेल मालकास खंडणीचीमागणी करुन चॉपरने वार करुन हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिडकोतील एका हॉटेल चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश कु-हे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सराईताचे नाव आह. कु-हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत हॉटेल व्यावसायीक अनिल पाटील (रा.वासननगर,पाथर्डीफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील सिडकोतील उत्तमनगर भागात असलेला हॉटेल पुनम नावाचा बिअर बार चालवितात. शनिवारी (दि.१३) दुपारी ते नेहमी प्रमाणे व्यवसाय सांभाळत असतांना ८४४६४१२९९६ या मोबाईल नंबरवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.
गणेश कु-हे नामक व्यक्ती बोलत असल्याचे सांगून मोबाईलवर बोलणा-या इसमाने त्यांना हॉटेल नियमीत सुरू ठेवायचे असेल तर दरमहा पाच हजार रूपे हप्ता द्यावा लागेल तसेच सदरच्या व्यक्तीने सायंकाळपर्यंत पाच हजार रूपये नाही दिले तर चॉपरने हातपाय तोडतो अशी धमकी दिली होती. पाटील यांनी प्रारंभी त्याकडे दुर्लक्ष केल्याने संशयिताने दिवसभरात वारंवार संपर्क साधत पैशांची मागणी केली. त्यामुळे पाटील यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक सुनिल पवार करीत आहेत.