इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भेटीमागे राजकीय कारण नसल्याचे स्पष्ट केले. तब्बल दीड तास ही भेट झाली. त्यानंतर ही भेट मराठा अणि ओबीसींमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचं वातावरणच्या पार्श्वभूमीवर असल्याचे समोर आले. या भेटीत भुजबळ यांनी शरद पवार यांनी या प्रश्नात पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यानंतर शरद पवार यांनीही भुजबळ यांची ही विनंती मान्य केली आहे. तसेच येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांना फोन करून या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मिटिंग घेणार असल्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे या भेटीमागे काही राजकीय घडामोडी असल्याच्या चर्चांना विराम बसला.
या भेटीनंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, आरक्षणाचा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे हा राजकारणाचा विषय नाही. राज्य शांत राहिलं पाहिजे. गोरगरीबांमध्ये दुफळी होऊ नये हे माझं मत आहे. त्यामुळे मी जाहीरपणे बोललो आणि साहेबांकडेही बोललो. या प्रश्नावर मी कुणाच्याही घरी जायला आणि कुणाशीही भेटायला मला कमीपणा वाटत नाही, असे ते म्हणाले.
या भेटीसाठी मी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून सांगितलं. शरद पवार यांना का भेटत आहे? त्यांच्याशी काय चर्चा करणार आणि कोणत्या विषयावर चर्चा करणार हे मी त्यांना सांगितलं. तसेच माझ्याकडे असलेली कागदपत्रे पवारांना देणार असल्याचंही पटेल यांना सांगितलं. त्यावर पटेल यांनी भेटायला जा म्हणून सांगितलं, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.