इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आरक्षणाची लढाई लढताना मराठा समाजाव्यतिरिक्त अन्य समाजाला बरोबर घेऊन दबावगट करण्याची तयारी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. या सोशल इंजिनीअरींगमुळे राजकीय समीकरणही बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे.
मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल, त्यांच्या पोरांचे कल्याण करण्यासाठी असेल तर निमंत्रणाची, प्रस्तावाची वाट न पाहता दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगरांसह समान दुःख असणाऱ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी मिळून दणका देवू, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी असुदुद्दीन ओवेसी, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ओवेसी यांनी जरांगे पाटील यांच्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. त्यासाठी प्रस्ताव यावा, असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी व्यापक भूमिका मांडली.
ते म्हणाले, की सर्वसामान्य वंचित, दुर्लक्षित समाज घटकांनी एकत्र येण्यात सर्वांचे कल्याण आहे. निमंत्रणाची वाट पाहण्यापेक्षा आपण सर्वांनी स्वतःहून एकमेकांच्या जवळ आले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन, एकमेकांना मतदान करून जात मोठी करावी. मला नेतृत्व करायचे नाही, त्याची हौस मला नाही. मी मराठा सेवक म्हणून काम करीन, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
ओवेसी, कडू, राजू शेट्टी, ॲड. आंबेडकर व सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्यांनी एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय तर मिळेलच; शिवाय आपण सत्ता परिवर्तन करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. वीस तारखेपर्यंत आम्ही पाहणार आहोत, असे सांगून फोनची वाट पाहण्यापेक्षा समाज मोठा होण्यासाठी एकत्र यायला हवे. सगळे समाज एकत्र आले तर जातीयवाद बंद होईल. स्वतःहून एकत्र येण्याने आपली जात मोठी होईल, असे ते म्हणाले. कुणी बरोबर आले नाही, तर आम्ही पाडायला मोकळे आहोत, याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.