इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः लग्नसोहळ्यात कशावरुन रुसवे, फुगवे होतील हे सांगता येत नाही. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात असेच रुसवे, फुगवे झाले व थेट त्याची मजल हाणामारीपर्यंत गेली. त्यामागचे कारण ठरले रसगुल्ला…लग्नासाठी आलेल्या वधू पक्षामधील नातेवाइकांत एका रसगुल्रल्यावरून येथे मोठा वादंग झाला. त्यांनतर एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. चेंगराचेंगरीत दोन महिला जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रसगुल्ल्यावरून भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते ही चकित झाले. हा वाद वधू किंवा वर यांच्या नातेवाइकांमध्ये झाला नाही, तर वधूच्या नातेवाइकांच्या दोन गटात झाला. लग्नाला आलेल्या एक नातेवाइकाने दुसरा रसगुल्ला मागवल्यावरून रसगुल्ला देणारा आणि नातेवाइक यांच्यात वाद झाला. वधूच्या मामाने इतर नातेवाइकांना आणखी एक रसगुल्ला देण्यास नकार दिल्याने त्यांना शिवीगाळ करण्यात आली. भडकलेल्या मामाने त्यांना शिवीगाळीने प्रत्युत्तर देत एका नातेवाइकाला धक्का दिला. त्यामुळे हा वाद वाढून हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. लग्नातील एका रसगुल्ल्याने संपूर्ण लग्नाचा रंग बिघडला आणि लग्न मंडपात अक्षदाऐवजी दगडांचा पाऊस पडला.
काही जणांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काहींनी मामाच्या दिशेने दगडफेक केल्याने हे प्रकरण आणखीनच चिघळले. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.