नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युनायटेड इंजिनीअरिंग वर्क्स सातपुर भागीदार यांच्यावर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा २८ लाख ६६ हजार १३९ रुपयाचा अपहार प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नाशिकच्या क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी दिली.
या अपहाराबाबत दिलेली माहिती अशी की, भारतीय दंड विधान कलम ४०६ व ४०९ अंतर्गत मेसर्स युनायटेड इंजीनियरिंग वर्क्स में भागीदार श्री. रणजितसिंग इंद्रजितसिंग सौंध व श्री परविन्दरसिंग इंद्रजितसिंग सौंध यांनी कर्मचारी भविष्य निधी वर्गणी रक्कम कर्मचा-यांच्या पगारातून कापूनही भरणा न करता गैरव्यवहार ( अपहार केल्याबद्दल फिर्याद दाखल केली आहे. मे युनायटेड ईन्जीनियरिंग वर्क्स, प्लॉट नंबर ई- ४८/४९ एम आय डी सी सातपूर. नाशिक – ४२२००७ ही संस्था कर्मचारी भविष्य निधी आणि प्रकीर्ण उपबंध अधिनियम १९५२ कायदा लागू असलेली एक भागीदारी संस्था आहे. सदर अधिनियम आणि योजना या संस्थेला दिनांक ३१/०७/१९८५ पासून लागू करण्यात आलेल्या असून उपरोक्त संस्थेने आमचे कार्यालयास सादर केलेल्या कागदपत्रानुसार या संस्थेच्या कामकाजास खालील व्यक्ती भागीदार म्हणून पूर्णपणे जबाबदार असल्याचेही आयुक्त प्रीतम यांनी सांगितले.
भविष्य निधी योजना कलम ३८ अन्वये उपरोक्त व्यक्तीना कर्मचा-यांच्या पगारातून कपात केलेली वर्गणी रक्कम व तेवढीच (समान) रक्कम मालकाचा हिस्सा मिळून अशी एकूण रक्कम भारतीय स्टेट बँक मध्ये कर्मचारी भविष्य निधी खात्यात दर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी किवा १५ तारखे पर्यंत भरणे आवश्यक होते.
कायदा काय म्हणतो
भारतीय दंड विधान कलम ४०६ व ४०९ मधील स्पष्टीकरण असे दर्शिविते कि एखाद्या व्यक्तीने मालक म्हणुन कामगाराच्या देय असलेल्या वेतनातून/पगारातून भविष्य निर्वाह निधी रक्कम (वर्गणी) ही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करण्यासाठी कपात केली असल्यास संस्थापित कायद्यान्वये सदर रक्कम ज्यांच्याकडे स्वाधीन आहे आणि जर तिचा योग्य वेळेत भरणा केला नाही तर सदरहू बाब ही कायद्या विरुद्ध असून अश्या व्यक्तींना कायद्या विरुद्ध सदर रकमेचा अप्रामाणिकपणे अपहार केला असे मानण्यात येईल.
गुन्हा दाखल
परंतु मे युनायटेड इंजिनीअरिंग वर्क्स चे भागीदार श्री रणजितसिंग सौंद व श्री परविंदसिंग सौंद यांनी कामगारांच्या पगारातून डिसेंबर २०११ ते मे, २०१९ या कालावधीत कर्मचार्यांच्या वेतनातून कपात केलेली कर्मचान्यांच्या हिश्याची भविष्य निर्वाह निधी वर्गणी रक्कम रुपये २८,६६, १३९/- (एकूण अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार एकशे एकोणचाळीस रुपये) कापलेली आहे, परंतु भविष्य निधी खात्यात जमा केलेली नाही, यावत क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्री अनिल कुमार प्रीतम यांनी मे युनायटेड इंजीनीअरिंग वर्क्स व त्यास जबाबदार असणाऱ्यां भागीदार व्यक्ती श्री रणजितसिंग इंद्रजितसिंग साँध व श्री परविन्दरसिंग इंद्रजितसिंग सौंध यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यास आदेश पारित केले होते, त्या आदेशानुसार भविष्य निधी निरीक्षक ललित लहामगे व रवींद्र जाधव यांच्याकडून ०३/११/२०२३ रोजी दुपारी ४.३७ वाजता सातपूर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान कलम ४०६ तसेच स्पष्टीकरण कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू रज्जाक पठाण याकडे सोपविण्यात आला आहे.