पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतातील हवाई वाहतूक क्षेत्राने मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर ही वाहतूक सेवा पोचली असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नव्या टर्मिनल वरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत देशात 469 नवीन हवाई मार्ग सुरू झाले असून दिल्ली, बंगळूर आणि अयोध्या यासारख्या विमानतळावर नवीन टर्मिनल उभी राहिली आहेत. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात देशभरात आणखी 20 ते 25 नवीन विमानतळांची उभारणी केली जाणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. पुण्यातील नव्या टर्मिनल मुळे वर्षाला सुमारे 90 लाख ते 1 कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक इथून करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या टर्मिनल मधील सर्व सेवा लवकरच नव्या टर्मिनल मधून उपलब्ध करून दिल्या जातील असे मोहोळ यावेळी म्हणाले.
पुण्यातील विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत अपुरे पडणारे जुने टर्मिनल लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावर या नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात आली असून पुण्याची संस्कृती आणि समृध्द परंपरा यांचे दर्शन या वास्तु मधून घडेल अशा पद्धतीने ते सजवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने 10 मार्च 24 रोजी या टर्मिनलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून आज हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित झाले आहे.