इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरच्या वापरातील ऑडी कार अखेर पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्या बंगल्यावरून काल रात्री ऑडी वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. काहीच दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी नोटीस बजावताच ही कार बंगल्यातून गायब करण्यात आली होती. तेव्हाही ही कार चर्चेत आली होती.
खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन लिहल्यामुळे तसेच लाल दिवा लावल्याने पूजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारसह कारचे कागदपत्रे तपासणीस हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पूजाने या ऑडी कारचा दोन दिवसांपूर्वी २७ हजार ६०० रुपयांचा दंडही भरला होता.
पूजा वापरत असलेली ऑडी कार चालकाने अचानक रात्री पुण्यातील चतुशृंगी पोलिस ठाण्यात नेऊन जमा केली. सरकारी कार्यालयात जाताना त्यांनी य कारवर महाराष्ट्र सरकार असे लिहिले. तिच्यावर दिवा लावला. प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना हे अधिकार नसल्याने पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली. दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजाच्या आई मनोरमा यांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश दिला नव्हता; मात्र काल रात्री त्यांच्या चालकाने गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली.