इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सात आमदारांची नावे आता समोर आली आहे. त्यात मराठवाड्यातील तीन, उत्तर महाराष्ट्रातील दोन, मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश असून, त्यांच्यावर आठवड्याभरात कारवाई होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांवर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांची हिंमत वाढली होती, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे ९, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे अशी क्रासव्होटिंग करणाऱ्या आमदारांची नावे आहेत. काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी या आमदारांच्या पक्षविरोधी कृत्याचा अहवाल दिल्लीला पाठवला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, की नांदेड व मुंबईच्या काँग्रेस आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवला आहे. आमच्या आमदारांना बॅलेटवर एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये मतदान करायचे होते; परंतु त्यांनी या फॉरमॅटचे उल्लंघन केले. त्यांना आम्ही ट्रॅप करून त्यांची ओळख पटवली आहे. आता त्यांच्यावर एका आठवड्याच्या आत कारवाई अपेक्षित आहे.