इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः ‘नीट’ परीक्षेत गुणवाढ करून घेण्याच्या प्रकरणात आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन मुलांची नावेही समोर आली आहेत. लातूरमधील रॅकेटमध्ये या विद्यार्थ्यांचाही संबंध असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुण वाढवण्यासाठी संजय जाधव, जलील पठाणमार्फत गंगाधरला पैसे दिल्याचे प्रकरण उघड झाले असताना आता संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांची नावे आली आहे.
लातूर नीटप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात सध्या तीन आरोपी अटकेत असून गंगाधरची चौकशी ‘सीबीआय’ करत आहे. गंगाधरच्या मोबाइलमध्ये सापडलेला डेटा तपासणीतून संभाजीनगर जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळली आहेत. या मुलांनी बाहेरील राज्यात जाऊन परीक्षा दिली असून त्यांची प्रवेशपत्रे आरोपीच्या मोबाइलमध्ये सापडली आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची चौकशी करून जबाब नोंदवण्यात आले.
संभाजीनगरच्या दोन विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे संजय जाधव किंवा जलील पठाण यांनी पाठवलेली नसल्याने गंगाधरच्या संपर्कात संभाजीनगर येथील आणखी कुणी नवा एजंट आहे का, याचा शोध घेतला जात आहे. लातूरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला चौथा आरोपी इरण्णा कोनगुलवार अजूनही फरार असून त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे मोबाइल बंद आहेत. ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी त्याच्या नातेवाइक आणि निकटवर्तीयांवर लक्ष केंद्रित केले आहे.