इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
न्यूयार्कःअमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्या कानावर गोळी लागली. पण, सुदैवाने फार गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. बंदुकीच्या गोळीचा आवाज येताच त्यांनी उजव्या कानावर हात ठेवला आणि खाली वाकले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीत व्यासपीठावर भाषण करीत असताना ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिस एजंट ट्रम्प यांना कव्हर करण्यासाठी तातडीने त्यांच्याजवळ पोहोचले. गोळीबार झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उभे केले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आणि कानावर रक्त दिसत होते. या वेळी ट्रम्प यांनी आपली मूठ घट्ट धरून हवेत हलवली.
त्यानंतर गुप्तहेरांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवून रुग्णालयात हलवले. या घटनेविषयी ट्रम्प म्हणाले, की उजव्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली आहे. त्यांनी ‘सोशल मीडिया’वर पोस्ट केले, की मला कानाजवळ एक आवाज जाणवला. त्यामुळे काहीतरी चुकीचे घडल्याचे माझ्या लक्षात आले.