नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख १२ हजार ४६७ महिलांनी नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये ३१ हजार ४५६ महिलांनी ऑनलाईन तर ८१ हजार ११ महिलांची ऑफलाईन नोंदणी करण्यात आली आहे. वैयक्तिक व शासकीय यंत्रणा बाहेरील व्यक्ती व्यतिरिक्त ही संख्या आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी शहरांसोबतच ग्रामपातळीवरही महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. सदर योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.