मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी विरोधात काम केल्यामुळे यावेळा काँग्रेसने कडक पाऊल उचरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसने कठोर कारवाई करणार आहेत. या फुटीर आमदारांची यादी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून फुटीर आमदारांसाठी ‘बदमाश’ अशा शब्दप्रयोग केला आहे.
या फुटीर आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप व अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. पटोले यांनी या सर्वांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदाराचा घोडेबाजार झाला. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे सत्ताधारी महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीचे केवळ दोन उमेदवार निवडून आले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मतांची बेगमी नसतानाही मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. काँग्रेसचे फुटलेल्या आमदारांवर काय होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पटोले यांनी गेल्यावेळी सुटलेल्या बदमाशांना या वेळी सापळा रचून पकडल्याचे सांगितले. विधान परिषदेच्या गेल्या निवडणुकीतही काही आमदारांनी बदमाशी केली; परंतु त्या वेळी त्यांना पकडता आले नव्हते. या वेळी त्यांना पकडण्यासाठी आम्ही रचलेल्या सापळ्यात ते अलगद सापडले, असे पटोले यांनी सांगितले आहे.