नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ शुक्रवारी रात्री आयशर आणि कारचा विचित्र अपघात होऊन त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्री नाशिककडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला. त्यामुळे ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा चालक आणि क्लिनर हे दोघे जखमी झाले आहेत.
अपघातात ब्रेझा कार क्रमांक (एम. एच. ०५ डी. एच. ९३६७) हिचा चक्काचूर झाला असून आयशर (टेम्पो क्रमांक (एम. एच. १५ जी. व्ही. ९१९०)चेही नुकसान झाले आहे. अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रहेमान तांबोळी अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी होते.
दरम्यान, अपघातानंतर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.