मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -गेल्या दोन वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
२७ जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. हे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन होते. राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरु केल्या. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’, अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची योजना, तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना आणि युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत १० लाख सुशिक्षित युवकांना १० हजार रुपये स्टायपेंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे समाजातील विविध घटक सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळातील सहकारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांच्या सहकार्याने हे अधिवेशन सुरळीतपणे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.







