नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावरील एका दारू दुकानासमोर टोळक्याने धुडघूस घालत चणे फुटाणे विक्रेत्या महिलेस मारहाण केली. या घटनेत खाद्यपदार्थाची हातगाडी पलटी करीत टोळक्याने गल्यातील रक्कम लांबविली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी या घटनेची दखल घेत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या असून त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत.
सागर राम सदावर्ते (२६) व रोहित चंद्रकांत जाधव (२५ रा. दोघे गरड चाळ,राहूलनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून किरण पाटील व त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत अलका रामा साटोटे (रा.सोनवणे बाबा चौक,समतानगर) यांनी फिर्याद दिली आहे. साटोटे या नाशिक पुणा मार्गावरील रावल वाईन्स परिसरात चणे फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या २७ जून रोजी रात्री त्या नेहमीप्रमाणे व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली होती.
संशयितांनी महिलेच्या मुलासोबत झालेल्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी संतप्त टोळक्याने हातगाडी पलटी करून लाकडी दांडक्याने तोडफोड करीत मालाचे नुकसान केले. या घटनेत महिलेस लाकडी दांडका मारण्यात आल्याने ती जखमी झाले असून संशयितांनी महिलेच्या दोन्ही मुलांना मारण्याची धमकी देत दिवसभरात फुटाने विक्रीचे गल्यातील ७०० रूपयांची रक्कम बळजबरीने काढून पोबारा केला आहे. या घटनेची दखल घेत पोलीसांनी दोघा संशयितांना जेरबंद केले असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण चौधरी करीत आहेत.