नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून पराभव पत्कारावा लागल्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपला सरकारी बंगला खाली करुन दिला आहे. गुरुवारी याबाबत अधिका-यांनी माहिती दिली. त्यांनी बंगला खाली केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना टारगेट करण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या बचावाचे ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे, आयुष्यात हार-जीत होतच असते. मी सर्वांना विनंती करतो की, स्मृती इराणी बद्दल अपमानास्पद भाषा वापरणे आणि वाईट वागणे टाळावे. स्मृती इराणी किंवा अन्य कोणी नेते असो लोकांना अपमानित करणे आणि अपमान करणे हे शक्तीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे.
खरं तर राहुल गांधी यांना असा बचाव केल्यामुळे अनेक जणांना आश्चर्य वाटले. गेल्या वेळेस अमेठीतून निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी व परिवाराबद्दल स्मृती इराणी यांनी नेहमीच टोकाची भूमिका घेऊन टीका केली. असे असतांना राहुल गांधी यांनी हा बचाव केल्यामुळे त्याची चर्चा आहे.