इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः परळी विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या रासपचे माजी प्रदेशाध्यक्ष, उद्योजक राजाभाऊ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन परळी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. फड हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहे. त्याचप्रमाणे ते मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत गेल्या १३ वर्षापासून काम करीत आहेत. फड यांच्या या भूमिकेमुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची परळी विधानसभा मतदार संघात डोकेदुखी वाढणार आहे.
पंकजा व धनंजय मुंडे यांचे दहा वर्षांचे राजकीय वैर लोकसभा निवडणुकीपूर्वी संपल्याने या मतदार संघात मुंडे विरोधात तगडा उमेदवार कोण नव्हता. पण, फड यांनी हे आव्हान तयार केले आहे. फड हे पंकजा यांच्या विश्वासातील समजले जातात. पंकजा यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्याने फ़ड रिंगणात उतरले आहे.
आपल्या भूमिकेविषयी फड म्हणाले की, आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मागणार आहोत, असे त्यांनी सांगितले.