इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यात एका आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करुन पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे कृत्य करणारे तिन्ही आरोपी अल्पवयीन असून यापैकी दोघांचे वय १२ आणि एकाचे १३ वर्षे आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आठ वर्षाची ही मुलगी तिसरीत शिकत होती. त्याच शाळेत शिकणाऱ्या सहावी व सातवीच्या तीन विद्यार्थ्यांनी तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. रविवारी ही घटना घडली.
तीन दिवसानंतर घटना उघड
या मुलांनी लपंडाव खेळण्याच्या बहाण्याने या मुलीला मुचुमरी सिंचन प्रकल्पाजवळील एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तिचे तोंड बंद करून त्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आल्यानंतर आई-वडिलांना सांगितल्यास अटक होऊ शकते, हा विचार करून तिघांनी तिची हत्या केली आणि मृतदेह कालव्यात फेकून दिला. प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने तीन दिवसांनंतर पोलिस या मुलांपर्यंत पोहोचले.