इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अनेक प्रकरणात केलेल्या फसवणुकीमुळे आता त्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधातील तक्रारीची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने अतिरिक्त सचिव दर्जाच्या एका अधिका-याची समिती स्थापन केली असून ही एकसदस्यीय समिती पूजा खेडकरांची चौकशी करणार आहे. पुढच्या दोन आठवड्यामध्ये या समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे.
आपल्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने तसेच त्यावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिल्याने त्या अडचणीत आल्या. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे त्यांची पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली. दिल्लीतील ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’ खेडकर यांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणाबाबत कारवाई सुरू केली आहे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यांनी ‘ओबीसी’तून अर्ज भरला. खऱ्या उत्पन्नाची माहिती दडवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ‘कॅट’ने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतरही पूजा सहा वेळा वैद्यकीय चाचणीस गैरहजर राहिल्या. खेडकर प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्याने त्या राज्य सरकारच्या कर्मचारी नसल्याने लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी त्यांची माहिती मागवू शकते.
खेडकर यांना या प्रकरणी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. दिव्यांगासाठीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी पूजा यांनी ‘कॅट’मध्ये दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांनी टाळाटाळ केली. त्यांनी केलेल्या याचिकेत तथ्य नसल्याने ती फेटाळण्यात आली. पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून त्यांची वाशिमला बदली करण्यात आली. ३२ वर्षीय पूजा महाराष्ट्र केडरची २०२३ च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय कोट्यातील लाभांचा गैरवापर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या परवानगीशिवाय पूजाने केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे.
दरम्यान, पूजाची बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूजा वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाली आहे. खासगी ऑडीवर व्हीआयपी क्रमांकासह लाल दिवा लावल्याची पूजाची छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे तिच्यावर सडकून टीका होत आहे. स्वत:च्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला, तसेच कारवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटीही लावल्यामुळे तिच्यावर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते; मात्र पूजा स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजाने बदलले होते. या सरंजामी थाटामुळे पूजा या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहे