नाशिक : गो हत्या रोखण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात असले तरी कसायांकडून नामी शक्कल लढविली जात आहे. चारही बाजूनी पॅक केलेल्या मालवाहतूक करणा-या अॅटोरिक्षातून कत्तलीसाठी गो-ह्याची वाहतूक केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. क्रुरतेने डांबलेल्या जनावराची सुटका करीत पोलीसांनी अॅटोरिक्षा जप्त केली आहे.
याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईनअली हुसेन पठाण (४५ रा.कृष्णा हॉस्पिटल जवळ,बजरंगवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मालवाहू अॅटोरिक्षातून क्रुरतेने बैलाची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबईनाका पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१०) सकाळी मिल्लत नगर भागात पोलीसांनी सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या हाती लागला.
संशयिताच्या एमएच १५ जी ७११७ या मालवाहू अॅटोरिक्षात दोन महिने वयाचा गो-हयास डांबून ठेवल्याचे आढळून आले. गो-हयाची सुटका करीत पोलीसांनी अॅटोरिक्षा जप्त केली असून याबाबत अंमलदार नवनाथ उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.