मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा): मिळकतीचे तात्पुरते रेखांकन मंजूर करण्याप्रकरणी फलटण नगरपरिषदेतील तत्कालिन मुख्याधिकारी, सहायक नगररचनाकार, लिपिकांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय, मंत्रालयस्तरावर त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.मंत्री श्री. सामंत म्हणाले की, सन २०२० मधील या मिळकतीचे तात्पुरते रेखांकन मंजुरीसंदर्भाच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी यांनीही चौकशी सुरु केली आहे. यासंदर्भातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करण्यात येऊन अहवाल आल्यानंतर आवश्यकता भासल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.