इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधासभेच्या निवडणुकीत महायुतीचा सुपडाच साफ होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी राज्यातील २२५ जागा जिंकेल, असे ते म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी अशा सर्वांना सोबत घेऊ. देशात आपले राज्य प्रगत करू. विधानसभेला २२५ जागा निवडून येणार असा विश्वास व्यक्त करताना ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केला, अशी टीका त्यांनी अजित पवार गटावर केली. राज्याचे चित्र बदलायचे असल्याने अनेक लोक सोबत येत आहेत. उदगीर आणि देवळालीत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मतदारांचा घात केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लातूरमधील गद्दारांना धडा शिकविण्याची जबाबदारी भालेराव यांच्यावर सोपवली. या मतदार संघातील चल बिचल आमच्या सहकाऱ्याच्या लक्षात आली होती. मातंग समाज त्यांच्या पाठीशी आहे. पक्षात त्यांच्यामुळे प्रभावी नेतृत्व मिळाले आहे. मराठी माणसाला गद्दारी आवडत नाही. तुम्ही विजय खेचून आणा, असे सांगत त्यांनी भालेराव यांच्या विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. लातूर जिल्ह्यात मदत होईल; पण राज्यात सुद्धा मातंग समाज सोबत आला पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले.
या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विलासराव देशमुख यांची आठवण काढली. त्यांनी मुख्यमंत्री असताना आघाडीचा धर्म पाळल्याची आठवण त्यांनी काढली. लातूर हा महत्वाचा जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या. भालेराव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षा त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.