नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सात लाख रूपये हात उसनवार देण्याचे आमिष दाखवून एकाने ई सेवा केंद्र चालकास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अनामत रकमेच्या डेबीट कार्डाचा वापर करून संशयिताने परस्पर रक्कम काढून घेतल्याने हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल पवार असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत स्वप्निल शांताराम बनसोडे (रा.बदलापूर जि.ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. बनसोडे यांचा ई सेवा केंद्र चालविण्याचा व्यवसाय असून अनेक ठिकाणी त्यांचे आधार केंद्र आहेत. संशयित आणि बनसोडे एकमेकांचे परिचीत असून दोघांची गेल्या मंगळवारी (दि.२) नांदूरनाका येथील हॉटेल प्रेस्टीज येथे भेट झाली होती. या भेटीत बनसोडे यांनी व्यवसाय वृध्दीसाठी सात लाखाची गरज असल्याचे सांगितल्याने त्याने मदतीचा हात दिला होता. सात लाख रूपये हात उसनवार देण्याचे संशयिताने आमिष दाखविले होते.
ऐनवेळी संशयिताने सुरक्षेच्या दृष्टीने काही तरी द्यावे लागेल अशी बतावणी केल्याने बनसोडे यांनी हातउसनवारीची रक्कम पदरात न पडताच शासकिय अमानत म्हणून ठेवलेले आयसीआयसीआय बँकेचे डेबीट कार्ड संशयिताच्या स्वाधिन केले होते. यावेळी संशयिताने कार्डचा युझर आयडी आणि पासवर्ड जाणून घेतल्याने ही फसवणुक झाली असून संशयिताने अनामत रकमेच्या सुमारे ८८ लाख रूपये रकमेतील काही रक्कम परस्पर काढून घेतल्याचे समोर आल्याने बनसोडे यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत.
…….