नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेअर ट्रेंडिगच्या बहाण्याने शहरातील पाच जणांना भामट्यानी तब्बल ८२ लाख ३४ हजारास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पावधीच्या गुंतवणुकीवर जास्तीच्या मोबदल्याचे आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आला असून यात तीन महिला आणि दोन पुरूषांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेसह शहरातील वेगवेगळया भागात राहणारे दिपाली कदम,शरद चिंचोले,सोमनाथ शेवाळे व निता मगर आदी गुंतवणुकदारांशी भामट्यांनी गेल्या २९ मार्च ते २९ मे दरम्यान संपर्क साधला होता. व्हॉटसअपच्या माध्यमातून चॅटींग करून भामट्यांनी त्यांना एका लिंकच्या माध्यमातून स्टॉक मार्केट ट्रेंडिगमधील गुंतवणुकीतून मिळणा-या लाभाचे प्रलोभन दाखविल्याने ही फसवणुक झाली.
महिलेसह अन्य चौघांनी लालसेपोटी लाखोंच्या रकमा विविध बँक खात्यात वर्ग केल्याने हा प्रकार घडला. या घटनेत ८२ लाख ३४ हजार ४६२ रूपयांची फसवणुक झाली असून अभासी रक्कम जमा असल्याचे दर्शवून गुंतवणुकदारांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले आहे. सदरची गुंतवणुक ही बोगस ट्रेंडिग अॅप्लीकेशनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे निदर्शनास येताच तक्रारदारांनी संबधीताशी संपर्क साधला मात्र तो होवू शकला नाही त्यामुळे त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.