इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: विधान परिषदेच्या सभापतिपदावर भाजपने हक्क सांगितला असताना आता अजित पवार गटानेही या पदावर दावा केल्यामुळे महायुतीमधील या पदासाठी असलेली रस्सीखेच समोर आली आहे. अजित पवार गटाचे विधान परिषदेचे चार सदस्य आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीची निवड सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली जाणार आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतिपद असून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याच काम पाहतात. आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने त्यावर भाजपने अधिकार सांगितला आहे. विधानपरिषद सभागृहात ७८ पैकी २७ जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार अपात्रतेचे दाखल झालेले दावे आणि आणखी फुटीर आमदारांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन संविधानिकदृष्ट्या महत्त्वाच्या या पदासाठी भाजप आग्रही असताना विधानपरिषदेत अवघे चार सदस्य असलेल्या अजित पवार गटाने दावा केला आहे.
विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे असे चार सदस्य असून सत्तेत सहभागी होताना विधान परिषदचे सभापतिपद देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असल्याचे अजित पवार गट सांगतात.