नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वास्तव्यास असलेल्या दोन विवाहीतांचा सासरच्या मंडळीने छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईस्थित सासरकडील मंडळीने एका पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेवून वडिलोपार्जीत मालमत्ता पतीच्या नावे करण्यासाठी तर दुसरीचा सदनिका घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणावेत या मागणीसाठी मानसिक व शारिरीक छळ सुरू आहे. याबाबत आडगाव व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आडगाव शिवारात राहणा-या पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुंबई स्थित पतीसह सासरच्या दोन महिला २०१९ पासून तिचा छळ करीत आहेत. चारित्र्याचा संशय घेवून संशयितांनी लग्नात मानपान दिला नाही या कारणातून वेळोवेळी कुरापत काढून वडिलांची मालमत्ता पतीच्या नावे करावी या मागणीसाठी छळ केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.
दुसरा प्रकार देवळाली कॅम्प येथील हाडोळा भागात घडला. याबाबत सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार२०२२ पासून तिचा छळ सुरू आहे. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात येवून छळ करण्यात आला. गुरूवारी (दि.४) माहेरी असतांना पतीने मोबाईलवर संपर्क साधत शिवीगाळ व दमदाटी केल्याने विवाहीतेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तीन पुरूष व चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.