नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय इनडोअर स्टेडियम येथे २२ वी नाशिक जिल्हा किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्कुल ऑफ सेल्फ डिफेन्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्वात जास्त पदकांची कमाई करून या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत स्कुल ऑफ सेल्फ डिफेन्सच्या खेळाडूंनी २४ सुवर्ण, १० रौप्य आणि १२ कास्य पदके पटकावली. या स्पर्धेत स्कूल ऑफ सेल्फ डिफेन्ससह अशोका युनिव्हर्सल स्कुल, के.के.वाघ स्कूल, विस्डम हाय, निर्मला कॉम्व्हेन्ट स्कुल, होरायझन अकॅडमी, उर्दू नॅशनल स्कूल, आर. पी. विद्यालय, जे. एम. सी. टी स्कुल, भोंसला स्कुल अश्या विविध शाळांच्या २२० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत लो किक, पॉइंट फाईट, सेमी कॉन्टॅक्ट, फूल कॉन्टॅक्ट आणि म्युझिकल फॉर्म अशा विविध इव्हेंटचा अंतर्भाव होता. या सर्व इव्हेंट्स मध्ये स्कुल ऑफ सेल्फ डिफेन्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक भूषण ओहोळ, तौसिफ शेख, राजू जैस्वाल, अनामय बिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण देण्यात येत आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे सर्व विजेत्या खेळाडूंची पुणे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्कूल ऑफ सेल्फ डिफेन्सच्या सर्व विजेत्यां खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ मंदार वैद्य, सोनाली जोशी आणि अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.