नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएन्ना येथे ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतली.अध्यक्ष व्हॅन डेर बेलेन यांनी पंतप्रधानांचे ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन केले.
दोन्ही देश त्यांच्या राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी करत असल्यामुळे ऑस्ट्रिया दौरा ऐतिहासिक आणि खास असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी पर्यावरणीय शाश्वतता आणि जागतिक तापमान वाढीविरोधात लढा देण्याबद्दल आपले विचार सामायिक केले. या संदर्भात, दोन्ही नेत्यांनी नवीकरणीय ऊर्जा, विशेषत: सौर, जल आणि जैवइंधन यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या परस्पर हिताच्या संधींवर चर्चा केली. अध्यक्ष व्हॅन डेर बेलेन यांना त्यांच्या सोयीनुसार भारत भेटीवर येण्याबाबत दिलेल्या निमंत्रणाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.