नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे. त्यादृष्टीने या महापर्वाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी सुत्रबद्ध नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत आयुक्त प्रविण गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपआयुक्त महसूल राणी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, नाशिक एमटीडीसी च्या उपसंचालक मधुमती सरदेसाई, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपला आराखडा तयार करतांना अत्यावश्यक बाबींना प्राधान्य द्यावे. तसेच आराखड्यामध्ये आवश्यक ठिकाणी नकाशांचा वापर करावा. त्याचप्रमाणे आराखड्यानुसार अंदाजित निधीची मागणी करतांना त्यात समाविष्ठ बाबींचा स्पष्ट व सविस्तर उल्लेख असणे गरजेचे आहे. नाशिकचे ब्रँण्डिग करतांना धार्मिक स्थळांशी निगडित थिम असावी. तसचे कुंभमेळा महापर्वाच्या काळात अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नियोजन करावे. आरखडा तयार करतांना कामांची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, जेणेकरून एकसारख्या कामांवर निधीचा अपव्यय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. सिंहस्थ कुंभमेळा काळात देशभरातून भाविक व नागरिक जिल्ह्यात येणार असल्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण व विकसित करण्याच्या दृष्टीनेही योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी असल्याने सर्व यंत्रणांना नियोजनासाठी पुरेसा अवधी आहे. यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांनी तयार केलेल्या कुंभमेळाच्या अंदाजित बाबनिहाय आराखड्याचे सादरीकरण केले.