इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ४६ वरून ५० टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करीत असते. एक जानेवारी व एक जुलै या तारखांना ही वाढ केली जा असते. सरकारने आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही वाढ १ जानेवारी ते तीस जून या कालावधीतील थकबाकीसह जुलैच्या वेतनाबरोबर रोखीने दिली दिली जाणार आहे. त्याचा फायदा शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.
यापूर्वी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महगाई भत्ता वाढवण्यात आला होता. त्या वेळी ४२ वरून ४६ टक्के महागाई भत्ता करण्यात आला होता. त्या वेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्याचा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता. जानेवारीत महागाई भत्ता वाढवला नसल्याने जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनचा महागाई भत्ता जुलैच्या वेतनात मिळणार आहे.दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.