इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मतदार यादी शुद्धीकरणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शासकीय विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांची मतदार यादीतील दुबार नाव नोंदणी असल्यास ती वगळण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकान्वये जारी केले आहे.
परिपत्रकात नमूद केलेल्या सूचनांनुसार शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची मतदार यादीतील नोंदणी ही नियुक्तीच्या ठिकाणी व संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांच्या मूळ रहिवासाच्या ठिकाणी किंवा यापूर्वीच्या कार्यरत असेल्या ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कार्यालयातील खातेप्रमुखांनी अधिकारी व कर्मचारी यांची दुबार नाव नोंदणी बाबत संबंधितांना फॉर्म नं ७ भरून विधानसभा मतदार संघात जमा करणे अथवा ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रे जोडून Voters helpline App किंवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलवर नाव वगळण्यासाठी अर्ज करणेबाबत सूचित करावे. मतदार यादीत दुबार नाव नोंदविणे किंवा नाव नोंदणी करतांना चुकीची माहिती सादर करणे हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३१ अन्वये शिक्षेस पात्र आहे, ही कायदेशीर तरतुदही सर्व अधिनस्त अधिकारी/ कर्मचारी यांच्या निदर्शनास शासकीय खातेप्रमुखांनी आणून द्यावी असेही परिपत्रकात नूमद केले आहे.
वरील प्रमाणे कार्यवाही करून सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून परिपत्रकासोबत जोडलेले स्वंय घोषणापत्र भरून घेवून अनुपालन अहवालासह ते जिल्हा निवडणूक कार्यालय, नाशिक येथे १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.