येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात २३ कोटी ५१ लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये रस्ते व पुलांसह महसूल अधिकारी निवासस्थानाच्या कामांचा समावेश आहे. या कामांना लवकरच सुरुवात होऊन मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग ०८ ते नांदेसर आडगाव चोथवा उंदीरवाडी बोकटे खामगाव ते प्रमुख राज्य मार्ग ०२ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ८० मध्ये सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख, अनकाई कुसमाडी नगरसूल अंदरसूल पिंपळगाव जलाल रोड राज्य महामार्ग ४५१ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.
त्याचबरोबर निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लासलगाव पाटोदा रस्त्यावरील राज्य महामार्ग १४ वरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ५० लाख, गाजरवाडी ते नांदूरमध्यमेश्वर ग्रामीण महामार्ग १२३ या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी, वनसगाव थेटाळे कोटमगाव प्रमुख जिल्हा मार्ग १७४ या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व सुधारणा करण्यासाठी ३ कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे.
येवला येथील महसुली अधिकारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी ५१ लाख
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुसज्ज असे निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता त्यांच्या प्रयत्नांतून पुन्हा महसुली अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या निवासस्थानांच्या कामास सुरुवात होऊन महसुली अधिकाऱ्यांना सुसज्ज असे निवासस्थान उपलब्ध होणार आहे.