इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊःलखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगातील दुमजली बस दुधाच्या कंटेनरवर आदळल्याने १८ ठार तर तीसहून अधिक जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात झाला.
बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या बसला बुधवारी सकाळी अपघात झाला. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती दुधाच्या कंटेनरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता, की गावकरी घाबरले. पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उन्नावचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. सीओ बांगरमाऊ अरविंद चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बचाव मोहीम राबवत आहेत.
लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलिस ठाण्याच्या स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर हा अपघात झाला. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी १४ जणांची ओळख पटली आहे. मेरठचा दिलशाद, शिवहरचा रजनीश, शिवहरचा लालबाबू दास, रामप्रवेश कुमार, भारतभूषण कुमार, बाबू दास, मोहम्मद सद्दाम, नगमा, शबाना, चांदनी, मोहम्मद शफीक, मुन्नी खातून तौफिक आलम अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे असून चार प्रवाशांची ओळख पटलेली नाही.