इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पाचे पाणी दिले जात नसल्याच्या निषेधार्थ आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सागंता समारंभासाठी गडकरी वसईत येत होते. ते कार्यक्रमस्थळाकडे जात असतानाच आगरी सेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेडे दाखवले. सध्या वसई, विरारचा पाणीप्रश्न पेटला आहे. या दोन शहरांना सूर्या प्रकल्पातून पाणी देण्याची नागरिकांची मागणी आहे. पाणीप्रश्न गंभीर झाला असताना गडकरी यांच्या दौऱ्यात काही अघटित घ़डू नये, म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तरीही गडकरी उड्डाणपुलाजवळ येताच आगरी सेनेच्या कार्य़कर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
आगरी सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी या आंदोलनाबाबत सांगितले, की सूर्या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तीन महिने झाले आहेत. त्याचे उद्घाटन अजून झालेले नाही. टंचाईच्या काळात या योजनेतून पाणी मिळायला हवे; परंतु राजकीय श्रेयवादासाठी उद्घाटन रखडले आहे. वसई जनता बँक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असताना गडकरी हे बहुजन विकास आघाडीचे आमदार हिंतेद्र ठाकूर यांच्यासमवेत एका मंचावर आले. त्यामुळे कायर्कर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यातून हे आंदोलन करण्यात आले.