मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणात फक्त मिहीर शाहच नाही, तर संपूर्ण शाह कुटुंब अडचणीत आले आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरणात दिवट्याला वाचवण्यात जसा संपूर्ण अगरवाल कुटुंबाचा सहभाग होता, तसाच सहभाग वरळीच्या प्रकरणात शाह कुटुंबाचा असल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे. अपघात झाल्यानंतर मिहीरला त्याच्या वडीलांनी तिथून पळून जा, आपण सर्व आरोप ड्रायव्हरवर टाकू, असा सल्ला दिला, तर त्याच्या आई, बहीण आणि मैत्रिणीने त्याला लपवण्यास तसेच पळून जाण्यास मदत केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात ६० तासानंतर महिरला अटक करण्यात आली. तर महिरची आई आणि बहिणीसह १२ जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी मिहीरचे वडील राजेश शाह याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याचा जामीन मंजूर केला आहे. वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणात मिहीरला वडिलांनी पळून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीचे घर गाठले. तिच्या घरी जाण्यापूर्वी त्याने तिला तीसहून अधिक फोन केले. घरी पोहोचल्यावर तिला त्याने अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तो दोन तास तिथेच झोपला. मैत्रिणीने मिहीर तिच्या घरी आल्याची माहिती त्याच्या आई आणि बहिणीला दिली. त्यानंतर आई आणि बहिण तिथे येऊन त्याला घेऊन बोरिवलीला गेल्या. बोरिवलीच्या घराला कुलूप लावून मिहीर, आई आणि बहिणीसह पळून गेला. त्यामुळे आता मिहिरची आई आणि बहिणीलाही पोलिस आरोपी करण्यात आले आहे.
मिहीरचा मोबाईल पश्चिम द्रुतगतीमार्गावर कांदिवली-बोरिवली दरम्यान बंद करण्यात आला. वरळी पोलिसांनी मिहीरच्या मैत्रिणीचाही जबाब घेतला आहे. पुणे पोर्शे प्रकरणाप्रमाणे, वरळी ‘हिट अॅड रन’ प्रकरणातही मुख्य आरोपी मिहीरला त्याचे वडील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह याने ‘तू पळून जा, अपघात ड्रायव्हरच्या हातून झाला, असे सांगू, असा सल्ला दिला. वांद्रे येथे मिहीरची गाडी बंद पडल्यानंतर राजेशने गाडीची नंबरप्लेट बदलण्याचा आणि गाडीवरील स्टिकर खोडल्याचे तपासात उघड झाले आहे. मिहीरच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ११ पथके स्थापन केली त्यानंतर तो ६० तासानंतर पोलिसांच्या हाती लागला आहे.
असा सापडला मिहिर
मिहिरच्या मित्राने मोबाईल १५ मिनिटांसाठी सुरु केला आणि लोकेशन ट्रेस झाले. बोरीवलीच्या पथकाने तातडीने जाऊन मिहिरला गजाआड केले. मिहिरची आई, बहीणही अटकेत आहेत.